सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. सोलापूर शहराच्या वाढीव लोकसंख्येचा आधार घेऊन प्रभागरचना झाल्यास 29 प्रभाग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नगरसेवकांची संख्याही 102 वरुन 115 होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची बहुसदस्य पद्धतीने निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यानुसार महापालिकेची प्रभाग रचना करण्याचा विचार झाल्यास वाढीव लोकसंख्येचा आधार घ्यावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 18 वर्षावरील मतदान केलेल्या मतदारांची संख्या नऊ लाख 13 हजार 10 होती. लोकसंख्या काढताना त्यामध्ये 30 टक्के अधिक वाढगृहीत धरावी लागते. 30 टक्के वाढ विचारात घेतल्यास दोन लाख 73 हजार 903 हजार वाढीव मतदार आहेत. त्यानुसार शहराची लोकसंख्या 11 लाख 86 हजार 913 गृहीत धरून प्रभाग रचना तयार झाल्यास एकूण 29 प्रभाग होतील. त्यामध्ये 28 प्रभाग चार सदस्यांचे आणि शेवटचा एक प्रभाग तीन सदस्यांचा असे मिळून 115 सदस्य शक्यता आहे.
महापालिका अधिनियमानुसार तीन लाखापेक्षा अधिक व सहा लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेची सदस्य संख्या 85 पेक्षा अधिक होणार नाही असा अधिनियम आहे. सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखाच्या आसपास गृहीत धरले तर सहा लाखांच्या लोकसंख्येपर्यंत 85 नगरसेवकांची संख्या होते. पुढील वीस हजार लोकसंख्ये मागे एक अतिरिक्त सदस्य याप्रमाणे पुढील सहा लाखांच्या लोकसंख्येच्या आधारे 30 नगरसेवक होतात. असे एकूण 115 नगरसेवक होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन सदस्यांची प्रभाग रचना केली होती. त्यावेळी सुद्धा सोलापूर महापालिकेच्या सदस्यांची संख्या 113 झाली होती. एकूण 28 प्रभाग केले होते. शेवटचा एक प्रभाग पाच सदस्य संख्येचा केला होता. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्रिसदस्य प्रभाग रचना रद्द केली होती.