Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur Municipal Corporation : आकुलवारांना पुन्हा पद दिल्यास राजीनामा देणार

नगरसेवक अनंत जाधवांचा आक्रमक पवित्रा, 'आयुक्त हटाव'चा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नालेसफाईतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गत पाच महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असतानाही तत्कालीन नगर अभियंता सारिका आकुलवार यांना पुन्हा तेच पद दिल्यास आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असा इशारा भाजप नगरसेवक अनंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.

हिवाळी अधिवेशनानंतरही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर ठोस कारवाई न झाल्यास महापालिकेच्या सभेत आकुलवार यांना बडतर्फ करण्याची मागणी आणि आयुक्त हटावचा ठराव मांडण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.

आयुक्तांनी २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार पोकलेनच्या बिलांची फेरतपासणी करण्यात आली. मोठ्या बूम पोकलेनच्या दोन कोटी ११ लाख रुपयांच्या नोंदविलेल्या बिलापैकी सुमारे ९० लाख रुपये देय असल्याचे तपासणीत समोर आल्याचा दावा जाधव यांनी केला. यामुळे सुमारे एक कोटी २१ लाख रुपयांची तफावत निदर्शनास आली आहे. टिप्परच्या बिलांमध्ये आणखी ५० ते ६० लाख रुपयांची तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकूण सुमारे तीन कोटी रुपयांची संभाव्य बचत झाली आहे. मात्र मशिनच्या कामाच्या तासांची कपात करण्यासाठी निश्चित तांत्रिक आधार आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, विभागीय चौकशीला गती द्यावी आणि कंत्राटदाराकडून अतिरिक्त रकमेची वसुली करावी अशी मागणी करत चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांकडे चार विभागांची जबाबदारी सोपविण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोठ्या पोकलेनच्या बिलात १.२१ कोटींची तफावत

मोठ्या पोकलेनसाठी २ कोटी ११ लाख ३८ हजार रुपयांचे बिल नोंदविण्यात आले होते. मात्र, तपासणीनुसार ९० लाख १८ हजार ८८० रुपयेच देय अपेक्षित असल्याने, यामध्ये तब्बल १ कोटी २१ लाख १९ हजार १२० रुपयांची तफावत आढळून आली आहे. ही रक्कम अद्याप अंतिम नसून, या बिलाची पुन्हा फेरतपासणी होणे आवश्यक असल्याचे नगरसेवक अनंत जाधव यांनी स्पष्ट केले.

तीन कोटींची बचत; तासांच्या फेरतपासणीची मागणी

मोठ्या पोकलेन आणि लहान बूमच्या बिलांमध्ये एकूण २ कोटी २९ लाख ४७ हजार रुपयांची तफावत आहे. याशिवाय टिप्परच्या भाड्यात ५० ते ६० लाखांची कपात अपेक्षित असल्याने महापालिकेचे सुमारे तीन कोटी रुपये वाचू शकतात. केवळ ३० टक्के कपात न करता, संबंधित उत्पादक कंपन्यांकडून तांत्रिक माहिती घेऊनच मशिनचे कामाचे तास निश्चित करावेत, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT