सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर महापौरपदी आता कुणाची लागणार याकडे लक्ष लागले आहे. निवडून आलेले आयाराम नगरसेवक की मूळ भाजपचे निवडून आलेल्या जुन्या कार्यकर्त्यांतून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
भाजपने यंदा महापलिका निवडणुकीत शत प्रतिशतचा नारा देत 102 पैकी 87 जागांवर विजय संपादन केले. त्यामुळे भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढली आहे. शहर उत्तर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून तिकीट देण्यात आले. यातील बहुतांश आयाराम नगरसेवक झाले. तिकीट वाटपात निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. नाराजीही व्यक्त करत आंदोलने केली. परंतु पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करत आयारामांना प्रवेश देत नगरसेवक केले. आता आयाराम नगरसेवकांची संख्या अधिक झाल्याने महापौर निवडीतही आयाराम नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापौरपदासाठी अद्यापही आरक्षण सोडत निघालेले नाही. डॉ. किरण देशमुख, शिवानंद पाटील, राजश्री कणके, संजय कोळी, विनायक विटकर, नरेंद्र काळे, अमर पुदाले हे भाजपाचे जुने नगरसेवक आहेत. रंजिता चाकोते, विनायक कोंड्याल, श्रीदेवी फुलारे यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महापौरपदी वर्णी कुणाची लागणार हे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच होणार आहे.