सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर  
सोलापूर

Solapur News : रुग्णवाहिकांचा खेळखंडोबा; साहित्यच चोरीला

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका सध्या चालकांअभावी वापरात नसून अक्षरशः धूळखात पडल्या आहेत.

रुग्णवाहिकांमधील बॅटरी, स्पेअर पार्टस्‌‍ आणि इतर साहित्य चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शिवसेनेचे गटनेते तथा जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी उघडकीस आणला. या प्रकरणी अमोल शिंदे यांनी थेट आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.लाखो रुपयांची सार्वजनिक मालमत्ता निष्क्रिय अवस्थेत का पडून आहे, चालकांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही आणि वाहनांचे संरक्षण कोणाच्या जबाबदारीत येते, अशा सवालांची सरबत्ती त्यांनी केली. मात्र, या प्रश्नांना आरोग्य विभागाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने शिंदे अधिकच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या रुग्णवाहिका बंद ठेवून खासगी रुग्णवाहिकांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन देण्याचा मोठा रॅकेट यामागे असू शकतो, असा गंभीर आरोपही अमोल शिंदे यांनी केला.

सार्वजनिक निधीतून खरेदी केलेली वाहने निष्क्रिय ठेवणे आणि त्यातील साहित्य चोरीला जाणे हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामध्ये काही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोल शिंदे यांनी लावून धरली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT