सोलापूर : नवीन मिळकतींचा शोध घेऊन मालमत्ता कर आकारणी करण्याच्या उद्दिष्टपूर्तीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील 19 कर निरीक्षकांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 35 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी या संदर्भातील कार्यालयीन आदेश काढले.
महापालिका प्रशासनाने 8 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन मिळकतींचा शोध घेणे तसेच अपार्टमेंटमधील शिल्लक फ्लॅट व गाळ्यांची दररोज किमान पाच मिळकतींची आकारणी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवून नवीन मिळकती करजाळ्यात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, 13 मेपर्यंतच्या सर्वेक्षण व आकारणी अहवालाचा आढावा घेतल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले. वारंवार सूचना, आदेश व निर्देश देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा न झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या निष्काळजीपणाबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही समाधानकारक कामगिरी न झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 56(2)(ड) अंतर्गत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेत उडाली खळबळ
पाच कर निरीक्षकांना प्रत्येकी एक हजार 500 रुपयांचा दंड आला आहे. तर 14 कर निरीक्षकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम मे 2026 च्या वेतनातून जून महिन्यात एकरकमी वसूल केली जाणार आहे. महापालिकेच्या महसूल वाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या मिळकत शोध मोहिमेत अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने विभागात खळबळ उडाली आहे.