Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur Municipal Corporation : कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

सानुग्रह अनुदानात ९०० रुपयांची वाढ; यंदा ४,५०० रुपये सानुग्रह

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक गोड होणार आहे. प्रशासनाने सानुग्रह अनुदानाच्या रकमेत ९०० रुपयांची वाढ केली असून पात्र कर्मचाऱ्यांना यंदा ४ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. गेल्यावर्षी हे अनुदान ३ हजार ६०० रुपये होते. सणासाठी दिले जाणारे १२ हजार ५०० रुपयांचे अग्रिम कायम ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मान्यतेनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. ऑक्टोबर २०२६ च्या वेतनासोबत सानुग्रह अनुदान आणि सण अग्रिमाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेतील कायम सेवकांपैकी एस-१४ आणि त्यापेक्षा अधिक वेतनस्तर असलेले अधिकारी वगळता अन्य पात्र कायम कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय रोजंदारी, बदली आणि मानधनावरील कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका तसेच शिवणवर्ग शिक्षिकांचाही यामध्ये समावेश आहे. सानुग्रह अनुदान आणि सण अग्रिमाची रक्कम दोन्ही मिळून सुमारे ४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

३१ मार्च २०२६ रोजी सेवेत असलेल्या आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षात किमान सहा महिने सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार अनुदान दिले जाणार आहे. मात्र निर्धारित निकषांनुसार सहा महिने निलंबित असलेल्या तसेच मागील आर्थिक वर्षात चार महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार नाही. दिवाळीसह अन्य सणांसाठी पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांचे सण अग्रिमही देण्यात येणार आहे. यापूर्वी घेतलेल्या अग्रिमाची परतफेड झाल्याची खात्री करूनच नवीन अग्रिम मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व बिल २ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुख्य लेखा अधिकारी विभागाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT