दीपक शेळके
सोलापूर ः महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आकाराला येण्याच्या प्रक्रियेला सुरुवातीलाच हादरे बसू लागले आहेत. भाजपसोबत जाण्यासाठी शिंदेंची शिवसेना अगतिक झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेची सत्ता दीर्घकाळ भोगलेल्या काँग्रेसची भिस्त मित्रपक्षांवर आहे. अशीच स्थिती ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.
हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यावरच ते भाजपला आव्हान देऊ शकतील, अशी सद्यस्थिती आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणवून घेण्याच्या नादात माकपची अक्षरशः काँग्रेसमागे फरफट सुरू आहे. या सगळ्या गोंधळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेमात्र ‘अब की बार 75 पार’चा नारा देत महायुतीतच बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा डाव खेळल्याचे दिसत आहे.
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या हालचालींना राज्यात वेग आला असला, तरी सोलापुरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विसंवादाचे वातावरण आहे. शहरात तीन आमदार असल्याने भाजापची ताकत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची रांग भाजपकडे लागली आहे. इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात गेटकेन उमेदवारांमुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी निष्ठांवत, विरूध्द नवे वाद सुरु आहे.
पक्षाची ताकद पाहता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा देत महापालिकेवर एक हाती सत्ता आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे मित्र पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपसमोर कोंडी झाली आहे. स्वबळावर ताकद दाखवण्याची स्थिती नसल्याने शिंदे शिवसेना भाजपच्या निर्णयांवर अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीवेळी महापालिका निवडणूकीत शिंदे शिवसेनेने 25 जागांची मागणी केली होती. याचा विचार करून महायुती करावी अशी मागणी करत सोलापूरातील शिंदेचा शिवसेना भाजपाच्या मागे फरफटत जात असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेत अनेक वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसची स्थितीही सध्या आव्हानात्मक आहे. काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण जात असल्याने मित्रपक्षांवरच काँग्रेसची भिस्त आहे. त्याशिवाय काँग्रेसमची सर्व मदार खा. प्रणिती शिंदेंवर अवलंबून आहे. उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यासच भाजपला थेट आव्हान देता येईल, अशी वस्तुस्थिती आहे. मात्र, जागावाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावरून आघाडीतील घटकांमध्ये अद्याप एकमत होताना दिसत नाही. दरम्यान, काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणून ओळख असलेल्या माकपची शहरात संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याने माकपला स्वतंत्र अस्तित्व दाखवणे कठीण जात आहे.