सोलापूर ः महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस 45, शिवसेना (उबाठा) 30, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला 20 आणि माकपला 7 जागा देण्याचे ठरले आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी शनिवारी (दि.27) पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची माहिती दिली. यावेळी माजी आ. नरसय्या आडम, माजी आ. प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश गादेकर, भारत जाधव, शिवसेनेचे नेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाध्यक्ष अजय दासरी, संतोष पाटील, युसूफ शेख, प्रा. अशोक निंबर्गी उपस्थित होते. महाविकास आघाडी ही सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, लोकहिताच्या प्रश्नांसाठी आणि सत्ताधार्यांच्या अपयशी कारभाराविरोधात एकसंघपणे लढणार असल्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला.
ताकदीने लढणार
4 जानेवारीपासून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जोरदार प्रचार, जनसंवाद आणि लोकांच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.