सोलापूर ः सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या निकालांचे अधिकृत राजपत्र सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे 102 प्रभागांतील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या निवडीला कायदेशीर मान्यता मिळाली असून, नव्या महापालिका स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे आज प्रसिद्ध केले आहे.
राजपत्रात प्रत्येक प्रभागातून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, पक्षनिहाय तपशील, निवडणूक प्रक्रियेची अधिकृत नोंद समाविष्ट आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार ही निवड अंतिम ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्याने आता महापौर, उपमहापौर व स्थायी समिती निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. या निवडणुकीत भाजपने तब्बल 87 जागा जिंकत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. एमआयएम, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मर्यादित जागांवर समाधान मानावे लागले. नव्या महापालिकेकडून शहर विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा याबाबत ठोस निर्णयांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
‘राजपत्र’ म्हणजे काय?
राजपत्र म्हणजे शासन किंवा निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केलेली अधिकृत अधिसूचना आहे. राजपत्रानंतरच महापालिका स्थापन, पहिली सभा, तसेच महापौर, उपमहापौर निवड प्रक्रिया सुरू होते. कोणताही कायदेशीर वाद किंवा निवडणूक याचिकेसाठी राजपत्र हा अधिकृत संदर्भ दस्तऐवज मानला जातो. राजपत्र म्हणजे निकालावर शासनाचा अधिकृत शिक्का. राजपत्र प्रसिद्ध होणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा शेवट आणि नव्या सत्ताकाळाची औपचारिक सुरुवात असते.