गैरहजरमुळे 15 सेवक सेवेतून काढले 
सोलापूर

Solapur News : गैरहजरमुळे 15 सेवक सेवेतून काढले

महापालिका आयुक्तांचा दणका ः बिगारी, सफाई कामगारांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : रजेचा अर्ज किंवा पूर्वमंजुरी न घेता विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिकेतील घनकचरा विभागाकडील 15 सेवकांना कामावर सेवेतून काढण्यात आले आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील झाडुवाली, बिगारी, वाहन चालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. संबंधितांची सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही कारवाई केली आहे.

या कर्मचार्‍यांकडे नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विनापरवालगी गैरहजेर राहिल्यामुळे प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला. जे सेवक दीर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत, अशा सेवकांची माहिती मागविण्यात आलेली होती. सेवकांची यादी तयार करुन यादीतील गैरहजर सेवकांच्या सेवापुस्तकासह दि.9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता महापालिका आयुक्त यांचेकडे हजर सेवकांची सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करणे बाबत, काही सेवकांना प्रत्येकी 10 हजार रुपये इतका दंड करुन कामावर घेणे बाबत आदेश दिले.

या दंडाची रक्कम माहे सप्टेंबर-2025 पेड इन ऑक्टोबर-2025 च्या वेतनातून कपात करणेत यावे, त्यांचा गैरहजर कालावधी बिनपगारी ग्राह्य धरणेत यावा त्यांच्या नोंदी सेवापुस्तकात घेण्यात यावे, असे आदेश दिले होते. विना परवाना गैरहजर राहिल्यामुळे त्या सेवकांकडे सोपविण्यात आलेल्या प्रभागातील दैनंदिन प्रभागातील स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण झाला. संबंधित कर्मचार्‍याकडून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) 1979 चे नियम 3 (1) एक व दोन) च्या तरतुदीचा भंग झाला असून त्यास सर्वस्वी कर्मचारी जबाबदार असल्याने या 15 सेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 56 (2) (ग) च्या तरतुदीनुसार पुढे नोकरी मिळण्यास सर्वसाधारणपणे अपात्र होणार नाही अशा रीतीने महानगरपालिकेच्या सेवेतून काढून टाकण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT