Solapur Municipal Corporation Election  Pudhari Photo
सोलापूर

Solapur News : बहुमत असूनही उपमहापौरपदासाठी पक्षाची तारेवरची कसरत

शापित खुर्चीची धास्ती; अनेक नगरसेवकांनी पदासाठी नकार दिला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौरपद हे शहराच्या राजकारणात शापित मानले जाते. या पदावर विराजमान असलेला नगरसेवक पुढील निवडणुकीत पुन्हा नगरसेवक म्हणूनही निवडून आला नाही. असा इतिहास आजवर पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने तब्बल 87 नगरसेवकांचे घवघवीत बहुमत मिळवले असतानाही उपमहापौर पदासाठी उमेदवार ठरवताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागली.

उपमहापौरपदाची ऑफर अनेक इच्छुक नगरसेवकांसमोर ठेवण्यात आली. मात्र शापित खुर्चीची धास्ती, भविष्यातील राजकीय गणिते आणि पुढील निवडणुकांचा विचार करता अनेकांनी या पदासाठी नकार दिला. अनेक नगरसेवकांना विचारणा केली. जेष्ठ आणि नवख्या उमेदवारांनी उपमहापौरपदासाठी नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. बहुमत असूनही योग्य चेहरा मिळवणे भाजपासाठी आव्हानात्मक ठरले. दरम्यान सोलापूर शहरातील मराठा समाजाचा महापौर पदावर असलेला दावा फेटाळण्यासाठी भाजपाने नियोजनबद्ध डावपेच खेळल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाजाला न्याय देण्याचा केवळ देखावा करत मराठा समाजच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची उपमहापौरपदी वर्णी लावत आम्ही मराठा समाजाला संधी दिली, असा दावा करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात मात्र या निर्णयामागे महापौर पदाचे प्रबळ दावेदार आनंद जाधव यांचा पत्ता कट करण्याचा छुपा अजेंडा असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपाच्या या साऱ्या राजकीय गणितात अखेर देवकर यांच्या नशिबी उपमहापौरपदाची लॉटरी लागली.

ठळक घडामोडी

  • कुणी सदस्य चार चाकी, दुचाकी तर कोणी रिक्षातून आले

  • काही जणांनी गळ्यात भाजप पक्षाचा शेला घातला

  • सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी उमेदवार विनायक कोंड्याल यांचे पालिकेत आगमन

  • नगरसेविकांसमवेत पतीदेव दाखल

  • शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांच्या समवेत आले काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे

शुक्रवारी विशेष सभा

महापौर, उपमहापौर निवडीसाठी शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर महापालिकेची विशेष सभा होणार आहे. पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी हे राहणार आहेत. यावेळी सुरुवातीला अर्ज छाननी, अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. दरम्यान, आवश्यकतेनुसार मतदान हात वर करून घेतले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT