Solapur municipal corporation Pudhari
सोलापूर

Solapur municipal corporation: करवाढीवरून महापालिकेत राडा; शिवसेना, काँग्रेसचे गटनेते निलंबित

महापौर कोंड्याल यांच्याकडून कारवाई : विरोधक आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये अक्षरशः राडा झाला. करवाढीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. यावर महापौर विनायक कोंड्याल यांनी गोंधळ घालणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे व काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या गोंधळातच पाणीपुरवठा योजनेला एकमताने मान्यता देण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार (दि. 20 एप्रिल) महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये झाली. सभेमध्ये तीस वर्षांचा विचार करून साकारण्यात येणारी 1400 कोटींची अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजनेचे सादरीकरण यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष आमनेसामने येत अभूतपूर्व गोंधळ उडाला. नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने कर वाढ लादण्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले.

शिवसेना गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जाताच महापौर विनायक कोंड्याल यांनी कठोर पाऊल उचलत अमोल शिंदे, चेतन नरोटे या नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित केले. त्यांचे माईकही बंद करण्यात आले. तसेच, सभागृह सोडले नाही तर पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, गदारोळाच्या वातावरणातच महापौरांनी अनेक विषयांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे, 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही एकमताने हिरवा कंदील मिळाला. सभागृहाबाहेर निलंबित नगरसेवकांनी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. एकंदरीत आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभागृह रणांगण बनले होते. सोलापूरच्या पाणीप्रश्नावरून राजकारण तापल्याचे पाहावयास मिळाले.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी समाजशास्त्र पाळले नाही,सभागृहात शिस्तभंग, अर्वाच्य भाषा वापरली आणि सूचनांकडे दुर्लक्ष केले उपस्थित नगरसेवकांची दिशाभूल करत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मे मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यांना बसता येणार नाही.
विनायक कोंड्याल , महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT