सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील 1389 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. स्थायी समितीने केलेल्या काही निर्णयांमध्ये सभागृहात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर होणार आहे.
प्रशासनाच्या बजेट मध्ये मोठे फेरफार करत 1389 कोटीचे बजेट स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे मान्यतेसाठी शिफारस केले आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या भांडवली निधीसाठी झोनच्या देखभाल दुरुस्तीचा निधी कपात करत 31 कोटींवरून तब्बल 101 कोटी रुपयांपर्यंत निधी नेला होता. मात्र, झोन कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्तीच्या निधीत कपात करून हा निधी भांडवली कामांसाठी वळवण्यात आल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीच या निर्णयावर आक्षेप घेतल्याने पदाधिकारी अडचणीत आले होते. त्यानंतर विभागनिहाय झालेल्या आढावा बैठकीत सत्ताधारी नगरसेवकांनी झोनचा कपात केलेला निधी जैसे थे ठेवण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना स्थायी समितीचा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभागृहात हा निर्णय फिरवला गेला तर आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, उत्पन्न वाढीसाठी गाळे, कर, प्रलंबित मिळकत कर वसुली यांसारख्या नव्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना बजेट आढवा बैठकीत केल्या आहेत. या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारून तो भांडवली कामांसाठी वापरण्याचा मानस आहे.
एकूणच, 1389 कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांची वाढ होऊन अंदाजपत्रक सभागृहात सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या सभेकडे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात भांडवली कामासाठी 31 कोटींची तरतूद केली होती. मात्र स्थायी समितीने 101 कोटींची तरतूद केली आहे. यासाठी झोन निधीला कात्री लावली होती. झोनला निधी नसल्याने विकासकामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाल्याने यास विरोध करण्यात येत आहे.