सोलापूर : महापालिकेच्या सन 2026-2027 च्या आर्थिक वर्षातील दीड हजार कोटींच्या अंदाजपत्रकास सोमवारी (दि. 30) अंदाजपत्रकीय सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या बजेटमध्ये 60 कोटींची वाढ करत प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी एक कोटी निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला 66 लाखांचा विकास निधी मिळणार आहे.
या सभेमध्ये शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांचे भाषण सुरू असताना भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली यांनी अडथळा आणल्याने या दोघांत शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. अंदाजपत्रकीय सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी अंदाजपत्रक सादर केले. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी मुख्य सूचना मांडली. यंदा महसुली 217 कोटी 62 लाख 80 हजार तर एकूण अंदाजपत्रकात 156 कोटी 41 लाख 80 हजारांची वाढ झाली.