सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील सन 2026- 2027 च्या 1449 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी (दि. 30 मार्च ) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळणार आहे. स्थायी समितीच्या बजेटमध्ये 60 कोटीची वाढ केली असून समान निधी धोरण स्वीकारत सर्वंना विकास कामासाठी निधीची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
महापालिकेच्या यशवंतराव बळवंतराव सभागृहात अर्थसंकल्पीय सभा झाली. महापौर विनायक कोंडा अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे, सचिव प्रवीण दंतकाळे व्यासपिठावर उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने सुरुवातीला 1383 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने विविध सूचना आणि शिफारशींसह त्यात 6 कोटीची वाढ करत 1389 कोटीचे अंदाजपत्रक सभेसमोर अंतिम मंजुरीसाठी सादर केले.
स्थायी समितीचे सभापती रंजिता चाकोते यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले, तर सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी सुधारित अंदाजपत्रक सभागृहात मांडले.सभेदरम्यान एमआयएमच्या वहिदा शेख, काँग्रेसचे नगरसेवक नरसिंग आसादे यांनी उपसूचना दाखल केल्या. या दोन्ही उपसूचनांवर सभागृहात दाखल झाल्याने काँग्रेस आणि एमआयएमची उपसूचना एकामध्ये विलीन करण्यात आली. बजेटवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. विरोधकांनी समान निधी वाटपाचा मुद्दा एकमुखाने मांडला, तर पदाधिकाऱ्यांसाठी राखीव निधीबाबतही चर्चा रंगली.
सुधारित अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी 118 कोटी रुपयांची तरतूद, तर पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार विकासकामांसाठी स्वतंत्र निधी ठेवण्यात आला आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि मूलभूत नागरी सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.एकमताने मंजूर झालेल्या या अर्थसंकल्पामुळे शहर विकासाच्या कामांना गती मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
200 कोटींचा म्युनिसिपल बॉण्ड
शहराचा वाढता विस्तार पाहता 1400 कोटीची पाणी पुरवठा योजना साकारण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून 600 कोटी राज्यशासान 300 कोटी, महापालिका हिस्सा आणि 200 कोटीचा मार्केट मधून म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत. यांची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये केली आहे.
महापालिकेचे उत्पन्न
महसुली उत्पन्न : 823 कोटी 95 लाख 76 हाजर
पाणी पुरवठा : 138 कोटी 29 लाख 60 हजार
भांडवली 28 कोटी 51 लाख
शासन अनुदान 347 कोटी 92 लाख
कर्ज आणि महापालिका बॉन्ड : 111 कोटी 10 लाख
महापालिका टॅक्स : 222 कोटी 36 लाख 50 हजार
मलमत्तेचे भाडे : 27 कोटी 5 लाख
विक्री व भाडे : 4 कोटी 85 लाख 35 हजार
महसुली अनुदान : 395 कोटी 56 लाख 35 हजार
कर्जावरील व्याज : 10 लाख 50 हजार
इतर उत्पन्न : 1 कोटी 16 लाख
महापालिकेचा खर्च
- वेतन भते : 250 कोटी 9 लाख 44 हजार
- निवृत्ती कुटूंब वेतन ; 135 कोटी 48 लाख
- प्रशासकी खर्च : 19 कोटी 14 लाख 40 हजार
- देखभाल दुरूस्ती : 111 कोटी 48 लाख 34 लाख
- घेतलेल्या कर्जाचे व्याज : 22 कोटी 6 लाख
- मक्तेदारांची प्रलंबित देणी : 10 कोटी
- पाणी पुरवठा खर्च : 133, 38 लाख 94 हजार
- भांडवली खर्च 185 कोटी 91 लाख