सोलापूर : महापालिका मालकीच्या गाळे आणि जमिनींच्या भाडेपट्ट्यावरील थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ अंतर्गत भाड्यावरील दंडाच्या रकमेत १०० टक्के सवलत असून मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे.
मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गाळे सील करण्यासह मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे. थकबाकी वसुलीसाठी ही योजना राबविली जात आहे. महापालिकेची देणी नियमित करण्याच्या उद्देशाने पात्र धारकांना ही सवलत दिली आहे. त्यामुळे पात्र भाडेपट्टाधारकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी आवश्यक भाडे व थकबाकी भरून दंडमाफीचा लाभ घ्यावा. योजनेच्या अटी, पात्रता, भरणा प्रक्रिया तसेच देयकांतील त्रुटींबाबत भूमी व मालमत्ता विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा
थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्यांचे गाळे तातडीने सील करणे, गाळा अथवा जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याचा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.
यांना मिळेल लाभ
मेजर गाळे, मिनी गाळे, समाजमंदिरे, अभ्यासिका, अधिकृत खोके, बीओटी मिळकती, २५६ गाळे तसेच टीपी-३/२३ गाळे यांच्या पात्रधारकांना योजनेचा लाभ घेता येईल.