मोहोळ : मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी परिसरात १८ शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत केबल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मुंढेवाडी शिवरात शेती करणारे अभिमान रामचंद्र व्यवहारे यांनी याबाबत तक्रारीत माहिती दिली आहे.
व्यवहारे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील ऊस व मका पिकांना पाणी देण्यासाठी बोअरवेलच्या माध्यमातून विद्युत मोटार सुरू करत होते. बोअरपासून स्टार्टरपर्यंत सुमारे ९०० फूट अंतरावर विद्युत केबल टाकण्यात आली आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी दिवसभर पिकांना पाणी दिल्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ते मोटार बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ८ वा . पिकांना पाणी देण्यासाठी ते स्टार्टरजवळ गेले असता बोअरपर्यंत जाणारी विद्युत केबल दिसून आली नाही.
शेतात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता केबल मिळून आली नाही. त्यानंतर शेजारील शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याही शेतातील विद्युत केबल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.चोरीस गेलेल्या ९०० फूट केबलची अंदाजे किंमत २७ हजार रुपये आहे.याप्रकरणी चोरट्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकारामुळे शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून विद्युत केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
नेमक्या किती फूट केबल चोरीला हे तपासाअंती स्पष्ट होणार
मुंढेवाडी येथीलच हनुमंत दत्तात्रय व्यवहारे, भारत व्यवहारे, पोपट रणपिसे, विजय व्यवहारे, विनोदकुमार हावळे, प्रदीप व्यवहारे, तुळशीदास व्यवहारे, चंद्रकांत डोंगरे, सौदागर व्यवहारे, हनुमंत व्यवहारे, अजय व्यवहारे, सुरेश चौगुले, अमोल व्यवहारे, विनोद गोडसे, महादेव वाघमारे, किरण व्यवहारे, परमेश्वर व्यवहारे आदींच्याही इलेक्ट्रिक केबल चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. पोलिस तपासानंतरच शेतकऱ्यांच्या नेमक्या किती फूट केबल चोरीला गेल्या हे समोर येणार आहे.