सोलापूर : प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मुंबई - सोलापूर अशी धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ऑगस्ट महिन्यापासून सोळाऐवजी आता वीस डब्यांची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार डबे वाढवण्यात आल्याने प्रवाशांना यामुळे फायदा होणार आहे.
केंद्रीय रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 28 ऑगस्टपासून होईल. त्यानंतर ही वंदे भारत एक्स्प्रेस नियमित वीस डब्यांसह धावणार आहे. यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह कुर्डूवाडी, दौड, पुणे व मुंबई येथील नागरिकांना याचा फायदा होईल. सोलापूर - मुंबई वंदे भारत रेल्वेला प्रथमपासूनच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वाढीव डब्यामुळे सोलापूरहून मुंबईला जाणार्या व येणार्या प्रवाशांची सोय झाली आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार रेल्वे बोर्डाने वाढीव डब्यांचा निर्णय घेतला. त्याची 28 ऑगस्टपासून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत आहे.योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, सोलापूर
सोलापूर मुंबई वंदे एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे वाढवल्यामुळे हुतात्मा व सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. भविष्यात या गाडीला अजून प्रतिसाद मिळेल.सचिन पाटील, अध्यक्ष, प्रवासी संघटना, सोलापूर