सोलापूर : सोलापूरकरांना मुंबईचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसने प्रवाशांना ४० मिनिटे आधी मुंबई गाठता येणार आहे.
या अत्याधुनिक रेल्वेला सोलापूर स्थानकावर पहाटे ४.२० वाजता थांबा देण्यात आला आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक २७६५२ बंगळुरूहून रात्री ७.४५ वाजता सुटून पहाटे ४.२० वाजता सोलापुरात येणार असून ती पाच मिनिटेच थांबेल व ४.२५ वाजता मुंबईला रवाना होईल.
पुणे व कल्याणमार्गे सकाळी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २७६५१ मुंबईहून रात्री ८.१० वाजता सुटेल. सोलापूरला पहाटे ३ वाजता पोहोचून ३.०५ वाजता बंगळुरूकडे रवाना होईल. ही वंदे भारत आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, बंगळुरू-मुंबई गाडी सोमवारी, तर मुंबई-बंगळुरू गाडी मंगळवारी धावणार नाही. अनंतपूर, गुंटकल, रायचूर, यादगीर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, पुणे व कल्याण येथे थांबे असतील. अधिकृत सुरूवातीची तारीख आणि तिकीट दर जाहीर होणे बाकी आहे.