सोलापूर : येथील प्रवाशांना मायानगरी मुंबईशी जोडणारी श्री सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही सुपर फास्ट धावणारी रेल्वेगाडी आज बुधवारी (दि. 8) पन्नास वर्षांची होत आहे. ही गाडी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. दि. 8 एप्रिल 1976 या दिवशी ही गाडी सुरू झाली. वस्त्रोद्योगाचे केंद्र सोलापूर ते राजधानीचे ठिकाण मुंबई अशा दोन शहरांतील सामाजिक, आर्थिक संबंध दृढ करण्यात ही रेल्वेगाडी महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून सोलापूरकरांना घेऊन मुंबईच्या दिशेने धावणारी 12116 व 12115 या क्रमांकाची सोलापूरहून मुंबईकडे (छत्रपती शिवाजी महाराज स्थानक) धावणारी ही गाडी पाच दशकांपासून प्रवाशांच्या विश्वासार्हतेची, पसंतीची ठरली आहे. रात्रीची सेवा (ओव्हरनाईट लिंक) करून देण्यासाठी ही गाडी सुरू झाली. ती गेल्या पन्नास वर्षांपासून नियमितपणे हजारो प्रवाशांची सेवा करत आहे.
गाडीची उपयुक्तता
सोलापूर ते मुंबई शहरांसह परिसरातील प्रवाशांंसाठी ही फक्त रेल्वेगाडी नसून, ती एक जीवनवाहिनी आहे. सोलापुरातून रात्री साडेदहाच्या सुमारास निघून ती मुंबईला पहाटे पोहोचते. सोलापुरात आलेल्या प्रवाशांना पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट व गाणगापूर या धार्मिक ठिकाणाला जाण्यासाठी ही गाडी दुवा म्हणून काम करते.
सिद्धेश्वर एक्स्प्रेस लक्षवेधी
सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे नाव हे श्री बसवेश्वरांच्या समकालीन व त्यांच्या विचाराचे प्रसार करणारे 12 व्या शतकातील कर्मयोगी संत श्री सिद्धरामेश्वर यांच्या नावावरून याचे नाव ठेवण्यात आले. प्रारंभी पारंपरिक आयसीएफ (इंटरजल कोच फॅक्टरी) नॉन-एसी व रात्रीची गाडी म्हणून ही रेल्वे धावत होती. सुपरफास्ट असा दर्जाही मिळाला असून, यामुळे गाडीची गती वाढली तर प्रवासाचा वेळ कमी झाला. निवडक टप्प्यांवर 130 कि.मी. प्रतितास वेगाने ही गाडी धावते. दोन्ही शहरांमधील 544 किलोमीटरचा अंतराचा प्रवास ही रेल्वेगाडी आठ तास पाच मिनिटांत पूर्ण करते. ही गाडी मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे व दादर या गाव शहरांना जोडते.