सोलापूर : बहुप्रतिक्षित मुंबई-सोलापूर विमानसेवा ही येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील विमानतळावरुन होणार आहे, अशी माहिती संबंधित विमानसेवा कंपनीच्यावतीने देण्यात आली. परंतु सोलापूर-बंगळुरु विमानसेवा कधी सुरू याची अजून प्रतीक्षाच आहे.
सेवेचे सर्व करांसह प्रारंभीचे भाडे 3 हजार 999 रुपये असणार आहे. या हवाई सेवेचे पहिले उड्डाण बुधवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही सेवा महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत आठवड्यातून चार दिवस - मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार - उपलब्ध असेल. या मार्गामुळे व्यावसायिक तसेच पर्यटकांसाठी अधिक सोयीस्कर होणार असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे. सोलापूर हे उद्योग, शिक्षण व संस्कृतीचे केंद्र असून या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. मुंबईशी व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
फ्लाईट एस5 333 : मुंबईहून दुपारी 12:50 ला सुटेल, सोलापूरला 14:10 ला पोहोचेल
फ्लाईट एस5 334 : सोलापूरहून 14:40 ला सुटेल, मुंबईला 15:45 ला पोहोचेल