सोलापूर

Solapur Crime : मुळेगाव तांड्यातील अवैध हातभट्टीवर छापा

साडेपाच लाखांचा मुद्देमाल नष्ट; ग्रामीण गुन्‍हे शाखा व राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या वतीने संयुक्‍त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकाने बुधवारी (दि. ७) संयुक्त कारवाई केली. या कारवाईत हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, रसायनांसह सुमारे पाच लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाने मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त पथकाने तेथे छापा टाकला. हातभट्टी निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल, चूल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळ-मिश्रित रसायन तसेच अन्य साहित्य असा एकूण पाच लाख ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने हातभट्टीचे अड्डे व साहित्य नष्ट करण्यात आले.

अवैध हातभट्टी तयार करण्यासाठी साहित्य बाळगल्याप्रकरणी संबंधित चार जणांविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही पुढील कारवाई सुरू आहे. अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून, अशा व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जगन्‍नाथ पाटील, अविनाश पाटील, शिवकुमार कांबळे, विजय शिंदे, विशाल मुळे, बालाजी कांबळे, ख्वाजा मुजावर, राम निंबाळकर, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, धनाजी पवार, सचिन शिंदे, विकास थोरात यांच्‍यासह भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT