मोहोळ: पुढारी वृत्तसेवा : देगाव (वा) (ता. मोहोळ) येथे कापड, चप्पल, इलेक्ट्रिक दुकानांना आग लागून अंदाजे १३ ते १४ लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री बाराच्या सुमारास घडली. तीन दुकाने जळून खाक झाली असून एक दुचाकीही जळाली आहे. लोकनेते साखर कारखान्याच्या अग्निशमन गाडीने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण समजलेले नाही. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दीपक मनोहर आतकरे यांचे कापड दुकान आणि चप्पल दुकान, अभिजीत आण्णासाहेब आतकरे यांचे गाड्यांच्या बॅटऱ्या व इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान आणि दादासाहेब रामा आतकरे यांचे पशुखाद्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले. तर दीपक आतकरे यांची मोटारसायकलही जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. गावातील तरुणांनी व नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. पण तोवर खूप उशीर झाला होता. दीपक आतकरे हे भूमिहीन आहेत. मात्र कष्टाळू आहेत. यातून या घटनेतून सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
हेही वाचा