सोलापूर : शहरातील विजापूर रोड परिसरातील सुशील नगर येथील आईने आपल्या मुलीसह रविवारी (दि. २६) पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास टिकेकर वाडीजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. वर्षा पांडुरंग आधटराव (वय ३३) आणि स्वरा पांडुरंग आधटराव (१४, रा. सुशील नगर, विजापूर रोड, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे पोलिस, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून दोघींचे मृतदेह विच्छेदनासाठी सोलापूर सिव्हील रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी मृत महिलेचा पती, सासरे, भाऊ, नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात उपस्थित होते. घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
आत्महत्येचे ठिकाण घरापासून ५ कि.मी.
सुशील नगरातील या माय-लेकी टिकेकरवाडीपर्यंत रेल्वे रूळावरून चालत गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हे ठिकाण त्यांच्या राहत्या घरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे. घटनेची वेळ पहाटेची आहे. रात्री अंधारात सोलापूरपासून टिकेकरवाडीच्या दिशेने ट्रकवरून चालत जाऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच या घटनेमागील गूढ वाढले आहे.