करमाळा : पावसाळ्याला जवळपास अडीच महिने उलटून गेले असतानाही सोलापूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आभाळात काळेकुट्ट ढग दाटून येत असले, तरी दमदार सरी बरसत नसल्याने ओढे-नाले अद्याप दुथडी भरून वाहिलेले नाहीत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
हलक्या पावसाच्या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी उशिराने खरीप पिकांची पेरणी केली. पिके आता फुलोऱ्यात आहेत. मात्र, दाणे भरण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात येणार आहे.
जिल्ह्यात अनेक भागात पावसाचे वातावरण निर्माण होत असले, तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढत आहे. काही दिवसांत चांगला पाऊस झाला, तर खरीप पिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी पिकांसोबत शेतात तणही मोठ्या प्रमाणात वाढले असून, शेतकरी तणनाशकांची फवारणी करत आहेत. उशिराने पेरणी केलेल्या पिकांची सध्या कोळपणी सुरू आहे. सध्या शेतकरी राबत असला, तरी पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याच्या भीतीने तो धास्तावला आहे.
वैराग परिसरातील सोयाबीन पीक कोमेजले
बार्शी तालुक्यासह वैराग भागातील दहिटणे, मुंगशी, सासुरे, राळेरास, शेळगाव, तडवळे, यावली, ढोराळे, इर्ले आदी गावांत अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या वाढीवरही परिणामाची शक्यता आहे.