Solapur Crime Pudhari
सोलापूर

Solapur Crime : महिलेचे अपहरण करून विनयभंगाचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हा

मोहोळमध्ये महिलेचा हात धरून जबरदस्तीने कारमध्ये बसविल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : शहरातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरातील ३९ वर्षीय महिलेचे जबरदस्तीने अपहरण करून निर्जनस्थळी नेल्याचा तसेच तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित महिला नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी पायी जात होती. कुरुल रोडवरील गरड कॉलेजजवळ कार आणि दोन दुचाकींवरून सात जण तिच्या मागून आले. त्यापैकी एका आरोपीने महिलेचा हात धरून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसविल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केल्यास तिच्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर महिलेला नजिक पिंपरी येथील पेट्रोल पंपाकडून तांबोळच्या दिशेने नेण्यात आले. गायरान परिसरात कार थांबवून तेथे महिलेबरोबर झोंबाझोंबी करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता काही आरोपींनी तिचे हात-पाय धरून तिला धमकावल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, महिला घरी परतली नसल्याने तिच्या पतीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी महिलेला बागवाननगर परिसरात आणल्याचे तसेच पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी आरोपींनी माफी मागून प्रकरण मिटवून घेण्याची विनंती केली. सामाजिक व कौटुंबिक कारणास्तव त्यावेळी तक्रार दाखल केली नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

मात्र, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी पुन्हा महिलेच्या घरासमोर आले. त्यांनी महिला व तिच्या पतीला शिवीगाळ करून महिलेला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी महिलेचा हात धरून ओढाओढ करण्यात आली तसेच तिच्या कपड्याला हात घालून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी चंद्रकांत तानाजी शिंदे, सुरेश मोहन शिंदे, मनोहर भाऊराव शिंदे, जालिंदर अर्जुन शिंदे, सुनील अर्जुन शिंदे, दीपक गोरख सावंत आणि विजय भाऊराव शिंदे (सर्व रा. मोहोळ रेल्वे स्टेशन परिसर) यांच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT