मोहोळ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा विक्रीच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी शहरालगतच्या मांडवे वस्ती येथे कारवाई करून तब्बल ४ लाख ६४ हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू जप्त केली. एकावर गुन्हा दाखल झाला. सुधाकर प्रभू मांडवे (रा. मांडवे वस्ती, मोहोळ) याच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १३ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली. याबाबत अन्नसुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील मांडवे वस्ती परिसरात राहणाऱ्या सुधाकर प्रभू मांडवे यांच्या वस्तीवर दि.१३ ऑक्टोबर रोजी अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी छापा टाकला असता त्याठिकाणी प्रतिबंधित मावा सुगंधित तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याचे निदर्शनास आले.
तेथील विनालेबल सुगंधित तंबाखू ५ पोती किंमत २ लाख ४० हजार, ३३२० गुडकू सुगंधित तंबाखू ७ पोती किंमत २ लाख २४ हजार असे एकूण ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अशोक यमनप्पा इलागेर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई पाटील करीत आहेत.