Crime News pudhari photo
सोलापूर

Solapur crime: मोहोळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१५ जण जेरबंद, २ फरार; ५४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहर : मोहोळ शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी (दि. २६ जून) शहरातील एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात १५ जणांना रंगेहात अटक करण्यात आली. तर पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण मागील दरवाज्‍यातून पसार होण्यात यशस्वी झाले. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असा एकूण ५४ लाख ३७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ–कामती रस्त्यावरील एसबीआय बँकेलगत बंद असलेल्या खोलीत राजेंद्र वसंत रसाळ याच्या माध्यमातून जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने दुपारच्या सुमारास छापा टाकला. कारवाईदरम्यान अनेक जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले, तर दोघे आरोपी पसार झाले.

छाप्यात पंचांसमक्ष पंचनामा करून रोख रक्कम, विविध कंपन्यांच्या मोटारसायकली, चारचाकी वाहन तसेच मोबाईल फोन असा ५४.३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश जगन्नाथ पाटील (नेमणूक – वाचक शाखा, सोलापूर ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोमनाथ सुरेश सलगर, पटुशा बळीराम शिंदे, धोंडीबा सिद्धप्पा राजमाने, सुनील बाळासाहेब गायकवाड, विलास महादेव रूपनर, संतोष भानुदास कृपाळ, हसन कमरुद्दीन तरफदार, मोहसिन गुलाब शेख, बाळासाहेब आनंदा सलगर, रघुनाथ विष्णू मिसाळ, नितीन भोसले, सुहास दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत अडव्यप्पा हत्तरगी, सोमनाथ लिंबा मिसाळ, नंदू गोरख चोरमोले, दशरथ धोंडीबा नाईकनवरे यांचा समावेश असून, त्यापैकी दोघेजण पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विशाल नवले, पोलिस कॉन्स्टेबल अश्विन धाईंजे, केशव माशाळ व त्यांच्या पथकाने केली. मोहोळ शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी रणशिंग फुंकले असून, अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT