Mohol Taluka Extramarital Affair Case
मोहोळ : पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधांमुळे, तसेच पत्नीकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून यावली (ता. मोहोळ) येथील २६ वर्षीय तरुण संजय राजाराम राऊत याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही धक्कादायक घटना ८ जुलैरोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या दोन महिन्यांतच सुखी संसाराला लागला सुरुंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावली येथील शेतकरी राजाराम नागनाथ राऊत यांचा मुलगा संजय याचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, म्हणजेच १० मे २०२६ रोजी दहिटणे (ता. उत्तर सोलापूर) येथील नवनाथ ननवरे यांची मुलगी स्नेहल हिच्याशी झाले होते.
परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच कौटुंबिक कलह सुरू झाला.पत्नी स्नेहल ही पती संजयसोबत बोलत नव्हती आणि सतत रुसून बसायची. तिने संजयला पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. व ती त्याला जवळ येऊ देत नव्हती. "माझे सौरभ शिंदे याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबतच राहणार, तू मला सोडून दे," असे म्हणून ती संजयसोबत सतत भांडण करायची.
पत्नीच्या या वागणुकीमुळे आणि तिच्या प्रेमसंबंधांमुळे संजय प्रचंड मानसिक तणावाखाली होता व पूर्णपणे खचून गेला होता. अखेर ७ जुलैरोजी स्नेहल आणि तिचे सासरे दहिटणे येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तिथून परत आल्यानंतर रात्री सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले आणि सर्वजण झोपायला गेले. संजयदेखील त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ८ जुलै रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास संजय झोपेतून उठला नाही. त्यामुळे त्याची आई त्याला उठवण्यासाठी खोलीत गेली असता, संजयने खोलीतील लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याला तातडीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर संजयचे वडील राजाराम राऊत यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी स्नेहल संजय राऊत आणि तिचा प्रियकर सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.