Chincholi MIDC Mahavitaran Office Robbery
मोहोळ : चिंचोली एमआयडीसी येथील महावितरण कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या लाखो रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दि. २० रोजी पहाटे सुमारे २.१० वाजता घडली. चोरीचा प्रकार सुरू असताना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना विरोध केला असता त्यांनी दगडफेक करून सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला.
चिंचोली एमआयडीसी परिसरातील महावितरण कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनियमची तार ठेवण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून तार चोरण्यास सुरुवात केली. यावेळी ड्युटीवर असलेले यंत्रचालक बाळासाहेब ननवरे आणि पहारेकरी चेतन भोसले यांच्या निदर्शनास चोरीचा प्रकार आला.
कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करून चोरट्यांना विरोध केला. त्यावेळी चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यातील एक दगड सुरक्षा रक्षकाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
चोरीस गेलेल्या अॅल्युमिनियम तारेची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, याची अधिकृत माहिती तपास आणि पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे चिंचोली एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून, महावितरणच्या कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या आवारात लाखो रुपयांचा विद्युत साहित्यसाठा ठेवलेला असताना रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच चोरट्यांच्या हालचालींच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. चोरट्यांनी नेमक्या किती किमतीची अॅल्युमिनियम तार लंपास केली आणि या चोरीमागे संघटित टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.