मोहोळ : अपुर्‍या जागेमुळे बस गाड्यांची झालेली दाटीवाटी. Pudhari Photo
सोलापूर

Solapur News | अपुर्‍या जागेसह दुरवस्थेत मोहोळ बसस्थानक

नुतनीकरणासाठी आ. खरेंची परिवहन मंत्र्यांकडे दहा कोटींची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : मोहोळ हे अंत्यत गजबजलेले बसस्थानक असूनही सदर ठिकाणी मागील 40 वर्षापासून कुठल्याही सुविधा नाहीत. तरी एस.टी. महामंडळाच्या निधी अंतर्गत नवीन सुसज्य असे एस.टी. बसस्थानक बांधकामास 10 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे आमदार राजू खरे यांनी केली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ बसस्थानकात सुरू असलेल्या पावसामूळेे तळे साचले आहे.सोयीसुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पावसाचे साचलेले पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवासी धावपळ करताना दिसतात तर दुसरीकडे एसटी बस चालकांची पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्याची कसरत सुरू असते. मोहोळ-पंढरपूर - आळंदी पालखी मार्ग व सोलापूर - पुणे असे दोन राष्ट्रीय महामार्ग बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंनी गेल्यामूळे मोहोळ शहरातील बसस्थानक अत्यंत अपुर्‍या जागेत राहिले असून ते प्रशस्त व्हावे, अशी प्रवाशांमधून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.

मोहोळ बसस्थानकातून पुणे, कोल्हापूर, अक्कलकोट, दक्षिण काशी पंढरपूरसाठी सातत्याने भाविकांची वर्दळ असते. तर तालुक्याचे ठिकाण असलेल्या या बरस्थानकातून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी ग्रामीण भागातून ये-जा करतात. या बसस्थानकातूनच लांब व जवळ पल्ल्याच्या अंदाजे 600 गाड्यानची वर्दळ आहे.तालुक्यात मुक्कामाला जाणार्‍या गाड्यांची संख्याही 20 च्या जवळपास आहे. पंढरपूरकडे जाणार्‍या प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस या गोष्टींचा त्रास होतो. प्रवाशांना व वाहनांना कमी जागेमूळे मोठी अडचण होत असून सदरचे बसस्थानक प्रशस्त करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, जवळ दोन मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र बसस्थानकात कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. नवीन सुसज्ज असे बसस्थानक उभारल्यास एस.टीच्याही उत्पन्नात वाढ होईल. यासाठी 10 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
- राजू खरे, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT