आष्टी : सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील साखर कारखान्यावर कामासाठी गेलेल्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुराचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणाऱ्या पाळीव कुत्र्याचाही या अपघातात मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास करमाळा बायपास रोडवर घडली.
बाळासाहेब नरवडे हे अनगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. सोमवारी काही वैयक्तिक कामासाठी ते कारखान्यावरून आपल्या गावी, आंबेवाडीकडे दुचाकीवरून निघाले होते. दुपारी चारच्या सुमारास करमाळा शहराच्या बायपास रोडवरून जात असताना, अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले.
दुर्दैवाने, त्याच वेळी पाठीमागून येणारे एक सुसाट वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने बाळासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत दुचाकीवर गळ्यात साखळी असलेला त्यांचा पाळीव कुत्राही होता, या अपघातात त्या मुक्या प्राण्यालाही आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची माहिती मिळताच आंबेवाडी गावावर शोककळा पसरली. बाळासाहेब यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली आणि आई-वडील असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.