मोहोळ: शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कॉलेजला निघालेल्या दोन विद्यार्थिनींच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. हा दुर्दैवी अपघात आज सकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास नजीक पिंपरीच्या हद्दीत घडला.
तांबोळे (ता. मोहोळ) येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७) ही विद्यार्थिनी मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात ११ वी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. आज सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १७, रा. नजीक पिंपरी) या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या. नजीक पिंपरी परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने (क्रमांक: MH 13 EP 0019) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेली स्नेहल वाघमोडे हिला तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, मोहोळ येथे ११ वी सायन्समध्ये शिकत आहे.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका उमद्या विद्यार्थिनीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने तांबोळे आणि मोहोळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.