सोलापूर: मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोमवारी (दि. 30) सोलापुरातील हत्या झालेले मनसैनिक बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची दुसऱ्यांदा भेट घेतली. यावेळी त्यांनी सरवदे यांच्या मुलांचे पालकत्व स्विकारत कुटुंबाला मदत केली.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीवेळी मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली. ऐन निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबाचे सांत्वन केले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा अमित ठाकरे हे सरवदे कुटुंबाच्या भेटीसाठी आले होते. सरवदे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगताना त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी माझी असेल, असे यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मदतही केली.
कठीण प्रसंगात कार्यकर्त्याच्या कुटुंबामागे ठामपणे उभा राहणाऱ्या अमित ठाकरे यांच्या या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण झाल्याचे पक्षातील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.