MLC Election pudhari photo
सोलापूर

Solapur MLC Election: विधान परिषदेसाठी होणार उद्या मतदान

राऊतांसाठी महायुती तर देशमुखांची भिस्त मोहिते-पाटलांवर

पुढारी वृत्तसेवा

‍‍‍सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवार (दि. १८) रोजी मतदान होत आहे. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत देशमुख यांच्यात थेट सामना आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचार यंत्रणा आणि नेत्यांच्या उपस्थितीचा विचार करता राजेंद्र राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

राऊत यांनी ४ जून रोजी अर्ज माघारीची वेळ दुपारी ३ वाजता संपल्यानंतर लगेचच प्रचाराला सुरूवात केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे यांच्यासह अनेक विद्यमान व माजी आमदार त्यांच्या प्रचारात सक्रिय होते. महायुतीच्या सर्व घटक पक्षांची यंत्रणा राऊत यांच्या मागे उभी राहिल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतीलच काही नेत्यांनी उघडपणे राऊत यांना पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, नारायण पाटील आणि उत्तम जानकर यांनी उमेदवार ठरवताना आपल्याला विश्वास घेतले नसल्याचे सांगत देशमुख यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.

दुसरीकडे वसंत देशमुख यांच्या प्रचारात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील सातत्याने सक्रिय दिसून आले. त्यांनी बैठका आणि भेटीगाठींतून देशमुख यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रचार केला. मात्र, महाविकास आघाडीतील अन्य प्रमुख नेते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची देखील प्रचारात उघड उपस्थिती नव्हती.

एकीकडे बड्या नेत्यांची फौज आणि दुसरीकडे धैर्यशील मोहिते-पाटील यांची एकाकी मोर्चेबांधणी अशा वातावरणात ही निवडणूक पार पडत आहे. आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT