सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय मिळविला. राऊत यांना पहिल्या पसंतीची 483 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांना केवळ 118 मते मिळाली. त्यामुळे राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
सोमवारी (दि. २२) सकाळी आठ वाजता जिल्हा नियोजन भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आघाडीवर होते. अवघ्या एका तासात निकाल लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वसंत देशमुख यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलेल्या अदृश्य शक्तीने देशमुख यांना नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. एकूण 615 मतदानांपैकी 602 मते वैध ठरली तर 13 मते अवैध ठरली. निकाल लागताच नियोजन भवन आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राऊत समर्थकांनी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण केली. बॅन्जो तसेच हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला. बार्शी तालुक्यातही विविध ठिकाणी राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे.