सोलापूर : सहाशेजणांची अदृश्य शक्ती आपल्या पाठीमागे आहे, अशी वल्गना करणाऱ्या खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची ही अदृश्य शक्ती निवडणुकी निकालावरुन गायब झाल्याचे दिसले. या अदृश्य शक्तीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण भाजपला अंगावर घेतले, मात्र अदृश्य हातांची शक्ती मिळवण्यात ते असफल ठरले.
निवडणूक लागल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांकडे केवळ १६ मते असल्याचे सांगत त्यांची खिल्ली उडवली. त्यांना प्रत्युत्तर देताना खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आमच्याकडे ६०० मतांची अदृश्य शक्ती असल्याचे सांगत निवडणुकीत रंगत आणली. प्रत्येकवेळी अदृश्य शक्तीचा दाखला देत परिवर्तन घडणार असल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी वेळोवेळी सांगितले. त्यामुळे पालकमंत्री गोरे व उमेदवार राजेंद्र राऊत यांनी बहुमत असतानाही कोणताही निष्काळजीपणा न करता संपूर्ण जिल्हा पिंजून काढला.
एकीकडे राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांनी उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्याबरोबर सर्वच स्थानिक आघाड्या तसेच उबाठा सेनेच्या नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला. तरी देखील खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या अदृश्य शक्तीच्या वक्तव्याने भाजप संपूर्ण ताकदीने पळाले. निकालानंतर खा. मोहिते-पाटलांची अदृश्य शक्ती गायब झाल्याचे दिसून आले. वसंत देशमुख यांना केवळ ११८ मते पडली. राष्ट्रवादीतील काही नेत्यांना हा आकडा दोनशेच्या पार जाईल, असा विश्वास होता, परंतु तो फोल ठरला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भाजपमधील काही आमदार नाराज आहेत.
जिल्हा बँकेच्या प्रकरणावरुन राजेंद्र राऊत यांनी अनेकांना टार्गेट केले. त्याचा फटका यांना बसेल. तसेच ठाण्याचा आशीर्वाद राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळेल, अशी चर्चा जिल्ह्यात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी निवडणूक हलक्यात न घेता संपूर्ण काळजी घेतली आणि खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची अदृश्य शक्ती गायब केली.