सोलापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत आ. विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासमवेत मंगळवारी (दि.२८) तातडीची बैठक घेतली.
'महापालिकेत आत येतानाच कुत्रे दिसतात, मग प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष आहे की नाही?' असा सवाल उपस्थित केला. कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या समर्थच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत नऊ वर्षाचा समर्थ स्वामी या लहान मुलाचा रेबीजने मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आ. देशमुख यांनी आयुक्तांशी चर्चा केली. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना करा. दुर्दैवी घटनेतील मृत बालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा विचार करावा, अशी सूचना आ. देशमुख यांनी प्रशासनाला केली.
'माणसं मेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?' असा संतप्त सवाल नगरसेवक राजकुमार पाटील यांनी उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी वाहन व मजूर उपलब्ध नाही. निर्बीजीकरणाबाबत कायदेशीर मर्यादा आणि नव्या कायद्यामुळे अडचणी येतात. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी दररोज किमान १३५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पशुवैद्यकीय अधिकारी सतीश चौगुले, नगरसेवक राजकुमार पाटील, संजय कोळी, शिवानंद पाटील, अमर पुदाले, विनायक विटकर आदी उपस्थित होते.