child marriage  pudhari photo
सोलापूर

Solapur News : लहान वयात प्रसूती, आई-वडिलांसह पतीला बेड्या

अल्पवयीन मुलींचे लग्न लावणे पडणार महागात, प्रसूतीवेळी शाळा, जन्म दाखला अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अल्पवयीन मुलींचे लग्न लावणे यापुढील काळात आई-वडिलांसह पतीलाही महागात पडणार असून प्रसंगी बेड्या पडतील. लग्नानंतर गर्भवती राहिलेल्या तरूणीला प्रसूतीपूर्व तपासणी व प्रसूतीच्यावेळी आपल्या वयाचा सक्षम पुरावा द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता व बालमाता रोखण्यापासून वयाचा पुरावा अनिवार्य केला आहे. अठरा वर्ष पूर्ण झालेला वयाचा पुरावा शासकीय व अन्य खासगी रुग्णालयातही प्रसूतीपूर्व तपासण्या करताना व प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होताना शाळेचा दाखला द्यावाच लागणार आहे. अन्यथा, एकाच वेळी कुटुंबातील अनेकांवर कारवाई हेोईल.

अलिकडच्या काळातही अल्पवयीन मुलींचे लग्न होत असून यातून त्या कमी वयात प्रसूत होतात. वय कमी असल्याने आई व होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांकडून दिलेला रहिवासी दाखला हे वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. अल्पवयीन मुलींचे विवाह व गर्भधारणेच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रामीण भागात अनेक महिलांकडे जन्म दाखला नसल्याने शाळेचा दाखला किंवा रहिवासी दाखल्याचा पर्याय म्हणून मान्यता दिली आहे.

गर्भवतींची अचूक माहिती मिळाल्यास त्यांना वेळेवर आरोग्य सेवा, लसीकरण, पोषण आहार आणि विविध शासकीय योजनांचा लाभ देणे सोपे होईल. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका या महिलांना आवश्यक कागदपत्रांबाबत जनजागृती करण्यात येते. दरम्यान, नवीन नियमाने वयाचा पुरावा हा नोंदणी प्रक्रियेच्यावेळी पूर्तता करावी लागेल. मात्र, यामुळे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल. एकंदरच अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्याचे धाडस अंगलट येणार आहे.

प्रसूती नोंदणीवेळी वयाचे पुरावे हवे

प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा, शासकीय आणि विमा रुग्णालयासह अन्य रुग्णालयातही प्रसुतीसाठी नोंदणी करताना जन्म, शाळेचा दाखला, दहावीचे प्रमाणपत्र आणि रहिवाशी दाखला सादर करावे लागणार आहेत. आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून गृहित धरला जात नाही.

अल्पवयीन मुलींच्या प्रसुतीच्या वेळी आई व होणार बाळ यांना धोका असतो. सिझेरियन प्रसूती करावी लागते. शारीरिक व्याधी जडू शकते. कुपोषित बाळ जन्मण्याची भीतीही असते. याशिवाय, प्रसूतीदरम्यान अल्पवयीन मुलींचा मृत्यूही होऊ शकतो.
- डॉ. सीमा क्षीरसागर, एमडी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी विमा रूग्णालय, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT