सोलापूर : मागील सहा दिवसांत 5.1 अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याने सोलापूरकर थंडीने कुडकुडले असून, शुक्रवारी 12.4 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. याआधी 9 डिसेंबर रोजी 12.4 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.
यंदा थंडीच्या मोसमाला उशिरानेच सुरुवात झाली आहे. दिवाळी सणावर पावसाळी वातावरण होते. नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली आहे. 7 डिंसेंबर रोजी 17.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात तापमानात सातत्याने घसरण होत आहे.
वाढत्या थंडीने पहाटेच्यावेळेस मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. काही जणांची दिवसाची सुरुवात ही उशिराने म्हणजे सकाळी 7 वाजलेपासून सुरु होत आहे. सोलापूर शहरातील विजयपूर रोड, किल्ला बगीचा, सिध्देश्वर मंदिर परिसर, सिध्देश्वर वन, स्मृती येथे नियमित योगासन, व्यायाम, वॉकिंगसाठी येणाऱ्यांच्या संख्येत कमी झाल्याचे चित्र आहे.
सकाळच्यावेळी वातावरणातील गारठ्यामुळे शाळकरी मुलांबरोबरच पालकांनाही थंडीचा सामना करावा लागत आहे. उबदार कपडे खरेदीसाठी बाजारेपठेत नागरिकांची गर्दी झाली झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील नागरिकांकडून ऊबदार कपड्यांना मागणी वाढल्याने त्याची अधिक किमतीने विक्री होतानाचे चित्र पाहायला मिळाले.