उत्तर सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच एनडीडीबीकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा जर विषय मार्गी लागला तर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. जिल्ह्यात खासगी दूध संस्थांच्या सुरू असलेल्या मक्तेदारीवर निश्चितच आळा बसणार आहे.
जिल्हा दूध संघ सुरू होता त्यावेळेला जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोन्याचा काळ पाहिला आहे. त्यावेळी जिल्ह्यात खासगी दूध संस्थांची मक्तेदारी झाली नव्हती. दूध संघाच्या तोडीस तोड त्यांना दूध उत्पादकांना प्रति लिटरला दर द्यावा लागत होता. मात्र दूध संघामध्ये सहकारापेक्षा राजकारण मोठ्या प्रमाणात घुसल्यामुळे दूध संघाची दयनीय अवस्था झाली.
अनेक राजकारण्यांनी त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्नही केले. मात्र त्यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. नेमक्या याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यात खासगी दूध संस्थांनी आपली मक्तेदारी सुरू केली. त्यांच्या मनाला वाटेल तो दर ते दूध उत्पादकांना देऊ लागले. दुसरा सक्षम पर्याय समोर नसल्यामुळे दूध उत्पादकांचा नाविलाज झाला. आपले दूध खासगी दूध संघांना घालावे लागत आहे, ही गोष्ट दूध उत्पादकांसाठी अतिशय दुर्दैवाची आहे.
या सगळ्या प्रकरणाकडे जिल्ह्यातील अनेक राजकीय मंडळी पाहात होती. मात्र त्यावर उपाययोजना करण्यात कुणालाही यश आले नाही. जिल्हा दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक होऊन रणजितसिंह शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातच आता जिल्हा दूध संघ एनडीडीबीकडे हस्तांतर करण्यासंदर्भात नुकतेच मंत्रालयात या विषयावर बोलणे झाले आहे. जिल्हा दूध संघ एनडीडीबीकडे हस्तांतरित झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा सोन्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही.