सोलापूर

Solapur Murder Case: हातोड्याचा घाव घालून परप्रांतीय कामगाराचा खून

संशयित आरोपी फरार : पोलिस पथक मागे

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : तालुक्यातील करमाळा जेऊर रस्त्यावर झरे फाटा परिसरात असलेल्या एका सिमेंट कंपनीमध्ये किरकोळ वादातून परप्रांतीयाचा डोक्यात हातोडीचा घाव घालून खून करण्यात आला आहे.

महादेवकुमार मनोज शर्मा (रा. बिहार, सध्या रा. झरे फाटा, करमाळा) असे खून झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. जयंतकुमार उमेश शर्मा (रा. बिहार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवम बद्री शर्मा याने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

करमाळा तालुक्यातील झरे फाटा येथील स्वराज्य सिमेंट पाईप कंपनीत अनेक परप्रांतीय कामगार कामाला आहेत. त्यांना वास्तव्यास दिलेल्या रूममध्ये झोपेतून उठवल्याच्या कारणावरून वाद झाला. यातून हा थरार घडला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी जयंतकुमार खोलीचा दरवाजा बंद करून झोपला होता. मयत महादेवकुमार याला त्याच खोलीत झोपायचे असल्याने त्याने खिडकीतून दगड मारून जयंतकुमारला उठवले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून रात्री ११.४० च्या सुमारास आरोपी जयंतकुमारने गाढ झोपेत असलेल्या महादेवकुमारच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून त्याची हत्या केली व तो पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. आणि पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी भेट दिली. करमाळा पोलिस संशयित आरोपी जयंत कुमार शर्मा यांच्या मागावर असून, याचा पोलिस उपनिरीक्षक दिलीप ढोरे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT