सोलापूर : तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, बंगळूर आणि हैदराबादकडे स्थलांतर करावे लागू नये यासाठी सोलापूरच्या एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर कार्यवाही करू, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी कुलगुरूंनी करावी. सोलापूर विद्यापीठाचे प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६ अंतर्गत ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते. कार्यक्रमास खा. ज्योती वाघमारे, आ. सुभाष देशमुख, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, डॉ. दिवाकर कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अतुल लकाडे, डॉ. महेश खरात उपस्थित होते.
प्रास्ताविक कुलगुरू डॉ. महानवर यांनी केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ‘सारेगमपा’ विजेता गायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी, पुरस्कारप्राप्त सुभाष नकाशे यांच्या पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. अभिनेते दिगंबर नाईक यांनी निवेदन, तर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.