सोलापूर ः अनैतिक संबधात असताना दारुच्या नशेत महिलेच्या पहिल्या पतीपासून झालेल्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फरहान शेख (वय 3) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
शैनाज जाफर शेख (वय 28, रा. कोंडा नगर, एमआयडीसी, सोलापूर, मूळ रा. विजयपूर, कर्नाटक) ही मौलाली उर्फ अकबर अब्दुलरजाक मुल्ला (वय 44, रा. विजयपूर, कर्नाटक) याच्यासोबत सोलापुरात राहत होती. तिच्या पहिल्या पतीपासून फरहान हा तीन वर्षाचा मुलगा आहे. सोलापुरात मोलमजुरी करुन दोघे उपजिविका करीत होते. मौलाली याने 11 डिसेंबर रोजी दारुच्या नशेत फरहान याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने फरहान याला सोलापूरहून विजयपूर येथे उपचारासाठी नेले परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. यानंतर शैनाज हिने विजयपूर पोलीस ठाण्यात मौलाली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. विजयपूर पोलीसांनी याचा तपास करुन घटना सोलापुरात घडल्याने तो गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानुसार मौलाली मुल्ला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.