सोलापूर : सोलापूर शहरातील मुरारजीपेठ परिसरातील उच्च दाबाच्या विद्युत मनोऱ्यावर ६५ वर्षीय मनोरुग्ण चढून बसला. त्याला खाली उतरविण्यासाठी महापारेषणसह पोलिस, अग्निशमन दलाने तीन तास परिश्रम घेतले. अखेर दलाच्या सोबतीने काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता टॉवरवर चढून वृद्धाला पकडले आणि सुखरूप खाली आणले. मात्र या कालावधीत सर्वांची चांगलीच दमछाक झाली. तर शहरातील वीज सुमारे साडेतीन तास बंद ठेवावी लागली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
या वृद्धाचे नाव आणि पत्ता समजू शकले नाही. टॉवरवर चढल्याची माहिती तरुणांनी महापारेषण उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना दिली. त्वरित वीज पुरवठा खंडित करण्यात आला. महापारेषणचे कनिष्ठ तंत्रज्ञ मोहन कांबळे यांनी पोलिस व अग्निशमन विभागाला माहिती दिली. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन विभागाचे प्रमुख राकेश शाळुंखे , कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वृद्धाला खाली उतरण्याचे आवाहन करूनही तो राजी होत नव्हता. अग्निशमन दलाने मोठी शिडी लावली.
मात्र शिडी पाहताच वृद्ध आणखी वरच्या टोकाकडे गेला. त्यामुळे पोलिस आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांची चिंता वाढली.उडी टाकल्यास त्याला पकडता यावे यासाठी खाली जाळी टाकण्यात आली. अखेर काही धाडसी तरुणांनी टॉवरवर चढून वृद्धाला पकडले आणि सुखरूप खाली आणले. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले.