सोलापूर

Solapur Flight Service: विमानसेवेसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत बैठक

सोलापूरची विमानसेवा वारंवार बंद होणे, विमानफेऱ्या रद्द होणे आणि प्रस्तावित नवीन विमानसेवा प्रत्यक्षात सुरू न होणे, या गंभीर प्रश्नांवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरची विमानसेवा वारंवार बंद होणे, विमानफेऱ्या रद्द होणे आणि प्रस्तावित नवीन विमानसेवा प्रत्यक्षात सुरू न होणे, या गंभीर प्रश्नावर सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढील सोलापूर दौऱ्यात सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन सदस्यांना दिले आहे.

सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा अनिश्चित काळासाठी बंद होणे, सोलापूर–गोवा व सोलापूर–हैदराबाद सेवा नियमितपणे सुरू नसणे आणि सोलापूर–तिरुपती विमानसेवा अद्याप सुरू न होणे, या सर्व बाबींची माहिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

विमानसेवा ही निवडणुकीपुरती आश्वासने देण्याची बाब नसून सोलापूरच्या विकासाची मूलभूत गरज आहे, अशी भूमिका मंचाने मांडली. मुंबई, हैदराबाद, गोवा, पुणे आणि देशातील इतर महत्त्वाच्या शहरांशी नियमित विमानसेवा उपलब्ध नसल्यास बाहेरील गुंतवणूकदार, आय.टी. कंपन्या आणि व्यावसायिक सोलापूरला प्राधान्य देतील का, असा सवाल मंचाने उपस्थित केला.

विमानसेवा नसेल तर आय.टी. पार्कचे काय

सोलापूरमध्ये नवीन उद्योग, आय.टी. पार्क आणि मोठ्या गुंतवणुकीच्या चर्चा होत असताना शहराची हवाई कनेक्टिव्हिटी मात्र अनिश्चित राहणे, हा गंभीर विरोधाभास असल्याचे मंचाने स्पष्ट केले.

विमानतळाबाबत पारदर्शक माहिती हवी

विद्यमान होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगसह आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून विमानसेवा नियमित करण्याची गरज असल्याचे मंचाने सांगितले. तसेच बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावाबाबतही पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT