सोलापूर

Solapur MD Drugs Seized: एक कोटी नव्वद लाखांचे एम डी ड्रग्ज पकडले

शहर गुन्हे शाखेची सोलापुरात मोठी कारवाई; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : व्हीआयपी रोडवरील मुस्लिम कब्रस्तान जवळ उभ्या असलेल्या कारमधून एक कोटी 90 लाख रुपयांचे 950 ग्रॅम एम डी ड्रग्ज (मेफोड्रीन) शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. या कारवाईने सोलापुरातील ड्रग्ज रॅकेटला मोठा झटका बसला आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई भारत पाटील यांना माहिती मिळाली की, व्हीआयपी रोडवर एक संशयित कार थांबली असून, त्यामध्ये अमली पदार्थाचा साठा आहे. या माहितीनुसार व. पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखालील टीमने कारला गराडा घालून कारचालकास ताब्यात घेतले. कारच्या समोरील डिग्गीमध्ये 950 ग्रॅम एम डी ड्रग्जचे पॅकेट मिळाले. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने हे एम डी ड्रग्ज असल्याची खात्री केली. कारचा चालक रिजवान शब्बीर शेख (वय 20, रा. अंबिका नगर, नई जिंदगी, सोलापूर) याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने साहिल पिरजादे (रा.अल्तमश अपार्टमेंट, मंत्रीचंडक नगर, सोलापूर), अर्शद मुर्शिद (रा. मुस्लिम कब्रस्तान जवळ, सोलापूर) आणि एक अनोळखी इसम यांच्याकडून घेतले असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी साहिल पिरजादे याला ताब्यात घेतले. तिसरा आरोपी अरशद मुर्शिद हा फरार झाला. त्यांच्याकडून 950 ग्रॅम एम डी ड्रग्ज, एक कार असा एकूण दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये रिजवान शेख, साहिल पिरजादे, अरशद मुर्शिद आणि साहिल पिरजादे याची पत्नी कायनात साहिल पिरजादे (वय 30, मूळ रा. माहिम मुंबई, सध्या मंत्री चंडक नगर, सोलापूर) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेतील आरोपी साहिल पिरजादे आणि रिजवान शेख यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहा. पोलिस आयुक्त राजन माने, व. पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे, नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे, संजय साळुंखे यांनी पार पाडली.

पिरजादे पती-पत्नीने मुंबईहून आणले ड्रग्ज

साहिल पिरजादे आणि त्याची पत्नी कायनात पिरजादे यांनी मुंबईहून हे ड्रग्ज आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून अरशद मुर्शिद याने हे ड्रग्ज खरेदी करून कारमधून तो निघाला होता. परंतु पोलिसांनी कारचालकाला पकडल्याने मुर्शिद फरार झाला. दरम्यान, पिरजादे पती-पत्नींनी मुंबईतून कुणाकउून हे ड्रग्ज आणले, मुर्शिद हे ड्रग्ज कुणाला विकणार होता, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT