सोलापूर : ‘मोका’तून जामिनावर असलेल्या सराईत गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्यासोबत १६ गुन्ह्यात फरार असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले. त्यांनी केलेले पाच गुन्हे उघडकीस आणून सोनेचांदीचे दानिगे, रोख रक्कम, मोटारसायकल असा तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांचे पथक मंद्रुप हद्दीत गस्त घालत असताना अक्षय डोंगरे यांना माहिती मिळाली की, मोकामधून जामिनावर सुटलेला आरोपी सागर सफाल्या शिंदे, त्याचा सावत्र भाऊ व त्याचा आणखी एक साथीदार असे तीघांनी मिळून दक्षिण तालुक्यातील मनगोळी येथील वृद्ध महिलेस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरले आहेत.
सध्या ते अंत्रोळी फाटा येथे उभे आहेत. पोलिसांनी सागर ऊर्फ सागऱ्या सफाल्या शिंदे (रा. जामगाव, ता. मोहोळ) आणि त्याचा विधीसंघर्षग्रस्त सावत्र भाऊ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पाच गुन्हे केल्याचे कबूल केले. त्या गुन्ह्यातील 16.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 ग्रॅम चांदिचे दागिने, एक युनीकॉर्न मोटारसायकलसह रोख रक्कम असा एकुण तीन लाख 29 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, नागेश कोणदे, मोहन मनसावाले, जगदीश राठोड, दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, सतीश बुरकुल, अश्विनी गोटे, सुनंदा झळके यांनी पार पाडली.