स्मशानभूमी स्मार्ट कामांचा महापौरांनी घेतला आढावा 
सोलापूर

Solapur News : स्मशानभूमी स्मार्ट कामांचा महापौरांनी घेतला आढावा

गुणवत्ता, उपलब्ध सुविधांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी : कोंड्याल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः शहरातील स्मशानभूमींच्या सुविधावृद्धीसाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 14 स्मशानभूमींसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. प्राथमिक माहितीवरून तफावत दिसून येत असल्याने या कामांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना होणारा लाभ यांचा सखोल आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील बैठकीत आवश्यक तो निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

सोलापूर महापालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील स्मशानभूमी संदर्भात आढावा बैठक पार पडली. शहरातील स्मशानभूमींच्या सुविधा, विकासकामे व पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, चितारी, कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक विनोद भोसले, भरतसिंग बडूरवाले, मेघनाथ येमूल, व्यंकटेश कोंडी, बिज्जू प्रधाने, अक्षय अंजीखाने, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, सिद्धेश्वर कमटम, सत्यजित वाघमोडे, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सारिका खजुरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर शहरात एकूण 33 स्मशानभूमी असून त्यापैकी 14 स्मशानभूमींचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे. या 14 स्मशानभूमींच्या विकासकामांसाठी एकूण 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. बैठकीदरम्यान या सर्व कामांचे सादरीकरण करण्यात आले. नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमींमध्ये अंतर्गत रस्ते, पथदिवे, वेटिंग शेड, बर्निंग शेड, वॉशिंग एरिया, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, गॅस दाहिनी तसेच विद्युत दाहिनी आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कामांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर स्मशानभूमी संदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. कामांची गुणवत्ता, सुविधा आणि नागरिकांना होणारा लाभ याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. कामांची गुणवत्ता, दर्जामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा महापौर विनायक कोंड्याल यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT