सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने शहराच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. या आरक्षणामुळे भाजपमधील जवळपास प्रत्येक गटातील नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या. भाजपातील अनुभवी नगरसेवकांपासून ते नवोदित चेहऱ्यांपर्यंत अनेकांनी आपले दावे पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आ. देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल, आ. विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख, तसेच त्यांचे समर्थक अनंत जाधव व नरेंद्र काळे यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, राजकीय वर्तुळात सध्या खरी रस्सीखेच विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांच्यातच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेत 102 सदस्यीय सभागृहात भाजपाने तब्बल 87 नगरसेवकांची दमदार फौज उभी करत महापालिकेवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे यंदा महापौरपद भाजपचेच असणार, हे निश्चित असले तरी नेमका महापौर कोण? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. गुरूवारी (दि. 22) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये सोलापूरचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने महापौरपदाची संधी कोणालाही मिळू शकत असल्याने इच्छुकांनी आता थेट देवदर्शनांचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. कुणी कुलदैवतापुढे नवस केला आहे, तर कुणी मंदिरांमध्ये फेऱ्या वाढवल्या आहेत. यावेळी आपल्याच गळ्यात महापौरपदाची माळ पडावी, यासाठी अनेकांनी अक्षरशः देव-पाण्यात ठेवले असल्याची चर्चा रंगली आहे.
महपौरपदाचा अंतिम निर्णय हा फक्त संख्याबळावरच नव्हे तर पक्षश्रेष्ठींचा आदेश आणि त्यासोबतच सोलापूरमधील तीनही आमदारांची भूमिका या निवडीत निर्णायक ठरणार आहे. महापौरपदासाठी भाजपात अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या असून सर्वंच्या नजरा मुंबइतील पक्षश्रेष्ठीकडे लागल्या आहेत. भविष्यातील राजकीय समीकरणे, तसेच महापालिकेतील सत्तेचा समतोल राखणे, या सर्व बाबी लक्षात घेऊन भाजप नेतृत्व निर्णय घेणार असल्याने सर्व इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.
अन्य अधिकार पदांबाबतही उत्सुकता
महापौरपदाबरोबरच सभागृह नेता, उपमहापौर, तसेच विविध महत्त्वाच्या समित्यांची सभापती पदे कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत मागे पडलेल्या इच्छुक नगरसेवकांस सभागृह नेता, स्थायी समिती सभापती संधी देऊन पद वाटप करताना भाजपला सर्व गटांना सोबत घेण्याची कसरत करावी लागणार आहे.
ऐनवेळी धक्कातंत्र होणार का...?
भाजपकडे 49 नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. ज्यामध्ये 24 पुरुष आणि 25 महिला आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी अनेक दावेदार आहेत. प्रभाग 12 मधून विजयी झालेले विनायक कोंड्याल, प्रभाग 10 मधून विजयी झालेले प्रथमेश कोठे, प्रभाग दोन मधून जिंकलेले डॉ. किरण देशमुख हे तीन प्रमुख दावेदार आहेत. विनायक कोंड्याल हे महापालिकेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले असून चौथ्यांदा नगरसेवक झाले आहेत. आ.कोठेचे भाऊजी आहेत. डॉ. किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. आनंत जाधव आणि नरेंद्र काळे देखिल अनुभवी नगरसेवक आहेत. भाजप या प्रमुख दावेदारांना संधी देणार की ऐनवेळी धक्कातंत्र वापरून नव्याने एखादा नाव पुढे आणणार हे पहावे लागणार आहे.